✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲 8975672933/7058167957
🅱 - sambhojane1.blogspot.com
नातं म्हटलं की आठवतात अखंड, अविरत, चिरंजीव अखेर चालत आलेली एक आयुष्याची गाडी. मग त्या आयुष्याच्या गाडीत कधी कधी छोटी मोठी वादळे येतात तर कधी विकोपाला जाणारी युद्ध सुद्धा येतात. पण याच वादळातून आणि विकोपाला जाणार्या युध्दांमधून त्यांना सामोरे कसे जायचे याचे धडेही मिळतात आणि अनुभवही.
नाती म्हणजे माणसांचा एक मोठा सन्मान असतो जसा सन्मान तसा दर्जा त्या त्या माणसाला मिळत जातो. पण कधी कधी हीच नाती गुंतागुंतीची होऊन माणसातल्या माणुसकीवर काळिमा फासतात आणि त्यांना उद्ध्वस्त करतात. मग त्या नात्यांमधील गुंता नवरा-बायकोचा, आईवडील-मुले, गुरू-शिष्य, मित्रमंडळी, भावंड, प्रियकर-प्रेयसी वा अन्य कुठले यांचाही असू शकतो. एकमेकांशी एखादे नाते जोडले गेले किंवा जुळले गेले की आपोआप निर्माण होतात त्या अपेक्षा आणि ह्याच अपेक्षांमुळे गुंतून गेलेल्या नात्याचे रूपांतर नात्यांच्या गुंत्यामध्ये होते.
बऱ्याच वेळा प्रियकर-प्रेयसी त्यानंतर नवरा-बायकोमध्ये रूपांतर होते. कधी कधी ही नाती निभावणं आणि टिकवणं कठीण होऊन बसते. गुंतून गेलेल्या नात्याचे रूपांतर नात्याच्या गुंत्यामध्ये होते. मुले मोठी झाली की त्यांना पंख फुटतात आणि आई-वडिल अन् त्यांच्यामध्ये मतभिन्नता वाढत जाते. आणि त्यातूनच नात्यामधील गुंता वाढून अबोलपणाच्या आणि विभक्त कुटूंबाच्या गाठी निर्माण होतात. मग दिसू लागतात वृद्धाश्रमाच्या वाटा आणि दरवाजे.
एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा तयार करून अमूर्त गुरू-शिष्याचे नाते निर्माण केले. त्यामध्ये तो गुंतत गेला. हे नाते निभावता निभवता त्याला उजव्या हाताचा अंगठा दक्षिणा म्हणून गमावला लागला. ह्या गुरू-शिष्याच्या निर्मळ नात्यातही गुंता होताच.
मैत्री अशी आहे की नकळत एकमेकांशी मैत्री कधी होऊन जाते कळत नाही. आपोआप त्यात गुंतत जातो. निर्माण होता छोट्यामोठ्या तोडक्या-मोडक्या अपेक्षा आणि नात्यांमधील गुंता वाढत जातो. "ही दोस्ती सुटायची नाय" बोलणं खूप सोप्प आहे पण जेव्हा ह्याच दोस्तीचा गुंता वाढत जातो तेव्हा सोडवणं तेवढेच कठीण.
काहीही असलं अन् कसही असलं तरी "धरलं तर चावतयं, सोडलं तर पळतयं" आणि "बोटं धरायला दिल की हात धरतयं" असं आहे. माणूस असा आहे ना कुठल्या ना कुठल्या नात्यात गुंतत असतो. नात्याशिवाय जगणेच माणसाला कठीण आहे. मानवतेचे दुसरे नावच नाते होईल. जोपर्यंत हा माणूस पृथ्वीवर जिवंत राहील तोपर्यंत "नाते" ही अविरत राहील. मग ते कुठलेही नाते असो वा नात्यांमधील गुंता असो.
------------------------ S. D. Bhojane --------------------------