Monday, February 11, 2019

📱मोबाईल - एक व्यसन📱
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने
📲  ८९७५६७२९३३
🅱- sambhojane1.blogspot.com

          स्मार्टफोन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते मोठ्या किंमतीचे आणि आकर्षक असे मोबाईल. अत्यंत स्वस्तात आणि जलद इंटरनेटमुळे कामांना गती यायला हवी होती. लोकांना एकमेंकाशी जोडले जायला हवे होते पण या उद्देशाने त्याचा वापर फार कमी प्रमाणात होतो. माणसांना माणसाशी जोडण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त असणारे हे मोबाईल आणि इंटरनेट हे दुर्दैवाने एक व्यसन बनले आहे. मानसिकतेबरोबर शारीरिक आजारही बनत चालला आहे. जसे मोठ्या माणसांनी हे व्यसन जडुन घेतले आहे तसेच लहान मुलांच्या मनालाही निराशेने ग्रासुन त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलून दिले आहे.
          जशा प्रकारे मोठी माणसं आपल्या मोबाईलशिवाय एक मिनीट राहु शकत नाहीत तसचं काहीस लहान मुलांच्या बाबतीतही घडु लागले आहे. आजकाल बघायला गेलं असता मोबाईलसाठी हीच लहान मुले काहीही करायला तयार आहेत, अगदी जीवन संपवायला सुध्दा तयार आहेत. अशाच आपल्या निरागस आणि सोजवळ लहान मुलांना आपण असं हकनाक मरु द्यायचे का? असा विचार प्रत्येक घरातील पालकांनी केला पाहिजे.
          उदाहरण द्यायचे म्हटले तर आईनं मोबाईल गेम खेळायला दिला नाही या कारणाने 2013 मध्ये एका शाळकरी मुलीने आत्महत्या केली. एवढ्याशा छोट्याशा कारणामुळे आत्महत्या करावी लागली ही गोष्ट समजणे जरा अवघडच. खरंतर त्याचवेळी स्मार्टफोनमुळे येणार्या संकटाची चाहुल लागली होती, पण चर्चा करण्यापलीकडे काहीच झाले नाही. "आपला तो बाब्या, दुसर्याच ते कार्ट " अशा प्रकारची समजुत ठेवुन बहुतेक जण वावरत आहेत. "काय ही पोरं, आमची पोरं तशी नाहीत " असा प्रत्येक जण म्हणतो, पण घरोघरी मातीच्याच चुली असल्याचे दिसुन येते.
          एका 20 वर्षीय मुलीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली तसेच एका 10 वर्षीय मुलाने पंख्याला गळफास लावुन आत्महत्या केली. कारणं काय तर आईने मोबाईलवर गाणे ऐकण्यास मनाई केली म्हणुन त्याचा राग येऊन आत्महत्या केली तसेच कुणाच्या आईने मुलगा घराबाहेर पडत नव्हता म्हणुन आईने मोबाईल काढुन घेतला त्या रागाने आत्महत्या केली. अशी अनेक प्रकारची उदाहरणे ह्या स्मार्ट फोनमुळे घडत आहेत. पण मोबाईल दिला नाही  म्हणुन पालकांशी वाद घालणारी, अबोला धरणारी मुले आज घराघरांत दिसत आहेत. घराघरांमध्ये आणि पावलोपावली रस्तोरस्ती मोबाईलच्या स्क्रिनवर नजर खिळवलेले लोक वावरत असताना दिसत आहेत. दिवसभर काम करुन घरी परतलेले आई-वडील घरातही मोबाईलला चिकटुन राहत असतील तर त्याचंच अनुकरण करुन मुले धडे गिरवत आहेत. मग त्यांना तरी गैर कसे म्हणावे.
          आजकाल मोठी माणसं इंटरनेट वरुन चांगल्यापेक्षा वाईट गोष्टीच जास्त बघतात. तशाच प्रकारे त्याचं अनुकरण करुन ही मुले चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी जास्त बघतात. मोबाईलचा अतिवापरामुळे शारीरिक आणि मानसिक आजार उद्भवत आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदु बधीर होतो, मन मरुन जाते, कोणाबद्दल आस्था उरत नाही, निराशा वाढते अशा प्रकारचे आजार उद्भवत चालले आहेत. इंटरनेटच्या दुनियतेत प्रत्येकजण अतिशहाणा झाला आहे, या अतिशहापणाची किंमत बळी देऊन भागवायची का?
            स्मार्टफोन हे एक महत्वाचे गॕजेट आहे खरं, इंटरनेट ही काळाबरोबर चालण्यासाठीची गरज आहे खरी पण याचा योग्य वापर करण्याचे धडे मात्र गिरवण्याची गरज आहे. आपल्या लहान मुलांना वाचवायचे असेल तर, आधी आपण स्वतः म्हणजे पालकांनी वाचण्यासाठी धडपडण्याची गरज आहे. गरजेनुसार फोन आणि इंटरनेट वापरणे, मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रवृत्त करणे, पुस्तके वाचणे, नाटके पाहणे इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत. इंटरनेटचा वापर टाईमपास आणि खेळण्यासाठी न करता अभ्यासासाठी आणि कला शिकवण्यासाठी करता येतो हे शिकवले पाहीजे. इंटरनेट शायरी आणि स्टेटस् बघण्यापेक्षा आपल्या मुलांची, मित्र-मैत्रिणींची, जोडीदारांची मने जाणुन घेतली पाहिजेत. तरचं आपल्या चिमुकल्यांचा बळी जाण्यापासुन थांबवु शकता आणि नक्कीच ह्यामध्ये एक ना एक दिवस बदल घडुन येईल. नाहीतर एक दिवस असा येईल की, माणसाच्या मुलभुत गरजा अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे मोबाईल आणि इंटरनेट यांची मुलभुत गरजांमध्ये वाढ होईल.

--------------------- समाप्त ---------------------
              ❣S. D. Bhojane❣