Tuesday, January 8, 2019

🚫आत्महत्या🚫
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲  ८९७५६७२९३३
🅱- samebhojane1.blogspot.com

          मनुष्याने आपले आयुष्य १०० वर्षे फुलवावे आणि जीवनाचा आनंद घ्यावा असे विचार यजुर्वेदातील एका श्लोकात मांडण्यात आले आहेत ते असे.
   "पश्चेम शरदः शतम्, जीवेम शरदः शतम्, श्रुणुयाम शरदः शतम्
    प्रबवाम शरदः शतम्, अदिनाः स्थाम शरदः शतम्"
म्हणजेच आम्ही शंभर ऋतु पहावेत, आम्ही शंभर वर्षे जगावे, आम्ही शंभर वर्षे ऐकावे, आम्ही शंभर वर्षे बोलावे, आम्ही शंभर वर्षे सुदृढ रहावे.
         पण आजकाल १०० वर्षे काय साधी ५० वर्षे सुद्धा काढत नाहीत. का तर, त्याच मुळ कारण म्हणजे "आत्महत्या". जबरदस्तीने आपल्या शरीरातील असणार्या आत्म्याची हत्या करणे म्हणजेच आत्महत्या. तसे म्हणायला गेलं तर ५०% माणसाचे आयुष्य आत्महत्या या कारणामुळेच संपते. आयुष्यात उतार-चढाव हे येणारच असतात म्हणुन कधी शेवटचा निर्णय घेऊ नये. अपयशात खचु नये आणि आनंदात माजु नये. आत्महत्या ही एका व्यक्तीची समस्या नसुन समाजातील अनेक गट या प्रवृतीकडे आकर्षित होत आहेत.
          तसं म्हणायला गेलं तर कर्जबाजारी असणार्या व्यक्तीच फक्त मृत्युला कवटाळुन बसलेत असे नाही तर यामध्ये श्रीमंत व्यक्तीचा सुध्दा सहभाग आहे. म्हणुनच आत्महत्या ही व्यक्तीगत समस्या न राहता राष्ट्रीय समस्या बनली आहे. त्यासाठी वेगवेगळया प्रकारचे उपाययोजना शोधुन समाजाचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे.
          आत्महत्येमध्ये तसं पहायला गेलं तर व्यापारीवर्ग, पदवीधर विद्यार्थी आणि कष्टाळु-गरीब असे वर्गवारी आढळुन आल्याचे स्पष्ट होते. कोणी व्यापारी स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या करतो. कोणी विद्यार्थी    प्रेमभंगामुळे स्वतःच आयुष्य संपवतो. तर कोणी गरीब कर्जबाजारीमुळे स्वतःच आयुष्य संपवतो आणि स्वतःच्या कुंटुबाला संपवायला भाग पाडतो. प्रत्येकालाच जर आपल्या आयुष्यातील समस्या "आत्महत्या" केल्यावरच संपतील असे वाटत असते. पण खरं पाहता समस्या संपत तर नाहीत पण त्याच बरोबर जो होणारा ञास असतो तो जास्त सहन करावा लागतो. महाराष्ट्रामध्ये "शेतकर्यांच्या आत्महत्या" ही राष्ट्रीय समस्या व्हायला फार वेळ लागणार नाही.
          आयुष्य हे कधीच साधं-सोप आणि सरळ रेषेत जात नसते. आयुष्य म्हटलं की सुख-दुःख, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, ताणतणाव, बेकारी, अपयश या समस्या येतातच. सगळचं जर आपल्या मनासारखे होणार असेल तर त्याला जीवन कसं म्हणता येईल. मग मनाप्रमाणे घडलं पाहिजे हा अट्टाहास हवाच कशाला मी म्हणतो. दुःख सोसल्याशिवाय सुखाची चव कळत नाही तसेच "तळ" गाठल्याशिवाय "वर" यायला सुरुवात होत नाही.
           पण आजची पिढी एकदा तळ गाठला की आपण वर कधी येणारच नाही? या भीतीने खचुन जाते. निव्वळ अपयशाच्या भीतीपोटी केलेली आत्महत्या समजण्यापलीकडेच आहे. भौतीक सुखाच्या मागे धावता धावता पालक बालक मधला संवाद संपत चाललाय. आजचे पालक मुलाला म्हणतात, "अमुक हवे असेल तर तमुक कर" अशी अट असते. पण आपण आपल्या आई-वडिलांची अट पूर्ण करण्यात कमी पडतोय या विचारामुळेच नैराश्य मुलांमध्ये येते. आयुष्य सुरु होण्याआधीच संपवुन टाकणारे हजारो विद्यार्थीवर्ग आज या जगात वावरत आहेत.
          आजची युवापिढी कर्तव्य विसरत चाललीय, ती स्वतःचाच विचार करु लागलेत असा आरोप लावताना पालकवर्ग विवेकशक्ती हरवुन बसलेत हे म्हणायला हरकत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक मुलं "सुपरमॕन" नसते आणि प्रत्येक पालक हा सहज पुरवणारा "भांडवलदार" नसतो. आत्महत्या या एका दिवसात घडत नसतात. त्याच्या अगोदर अनेक महिने व्यक्तीच्या मनात चलबिचल चालु असते. त्याच काळात आधार देणे गरजेचे असते. आयुष्य जगण्याची उमेद देण्याची गरज असते. आणि नक्कीच एक ना एक दिवस हे आत्महत्यांचे प्रमाण थांबेल.

------------- समाप्त ------------